स्पंदन : ॥ १ ॥
१९ फेब्रुवारी २०००
तो शाल्मलीही असाच.
एकुलता. एकटा. एवढ्या गजबजाटात राहूनही नामानिराळा.
आपल्याच एकटेपणात मश्गुल.
किंचित दुर्लक्षितच.
गेली चार वर्ष पाहतोय, इतरांना मिळणारं कौतुक त्याच्या वाट्याला नाहीच. प्रचंडपणाकडे पाहून कुणीतरी विस्मय करावा, बस्स.
बाकी वर्षभर निरतिशय बहरलेला. इतरांसारखाच पानापानांनी डवरलेला. थोडासा निर्विकार, निरलस.
पण सरत्या हेमंतामध्ये सारं पर्णवैभव ओसरू लागतं आणि ऐन शिशिरात किंचित अचानकच हा फुलून येतो. त्याच्या या फुल ण्याकडे ल़क्ष जाईपर्यंत फांदीवर एकही पान उरलेलं नसतं.
त्याचं हे फुलणंही असं स्वतःतच मग्न असल्यासारखं असतं... एकटेपण जपणारं.
धुंद; उच्छृंखल मात्र नाही.
राजस; पण त्यातही इतरांची अवहेलना करण्याचा अजिबात हेतू नसतो... खरंच निरलस.
असाच तो आत्ताही फुलून आला आहे...
स्पंदन : ॥ २ ॥
२९ फेब्रुवारी २०००
सावरीचं गळणारं ते एकेक फुल उगाचच जुन्या जखमांना छेडून गेल्यासारखं ओघळतं...
एरव्ही माझं फुलवेडेपण मित्र-मैत्रिणींच्या चेष्टेचा विषय. झाडाखालची फुलं वेचणं हा माझा अक्षरशः नित्यक्रमच. पण सावरीच्या तळाशी सांडलेल्या बिछायतीची किनारही मोडणं जमत नाही.
नकोसं वाटतं; का कोण जाणे...
त्या फुलाचा हलकासा स्पर्शही तीक्ष्णपणे "काहीतरी" जागवून जातो.
पूर्ण उमललेल्या फुलाचा देठ असावा त्याप्रमणे मी अस्वस्थ होतो...
स्पंदन : ॥ ३ ॥
७ मार्च २०००
आता मात्र त्या शाल्मलीकडे पाहणंही नकोसं वाटतंय.
विराण, संन्यस्तासारखा विरक्त आणि तरीही गुहेतल्या गौतमाच्या मूर्तीसारखा समाधानी भासतोय तो...
निष्पर्ण तर तो केव्हाचा झाला होता; आता ते पुष्पवैभवही ओसरलंय.पायतळीची सुमरासही कोमेजून गेलीय...
तसं त्याचं वैभव पलाशासारखं बेधुंद नसतं;
सुरंगीची असावी तशी गंधगाथाही त्याची नाहीच.
तरीही...
ठाऊक आहे मला, आता पुन्हा वसंत येईल.
पुन्हा लसलसत्या पालवीचे कोंभ मिरवत तो तसाच एकाकीपणाच्या दिमाखात उमलेल...
तेव्हा बहुधा मी नसेन इथे...(कदाचित).